सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीकडे शरण आला आहे. या घटनेनंतर पुणे येथील CID मुख्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला. मागील 15 दिवसांपासून सीआयडीच्या पथकांनी कराडचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. कराडचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते. नंतर त्याचा फोन बंद पडला. संतोष देशमुख यांच्या कन्या वैशाली देशमुख यांनी या सर्व घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींच्या अटकेसाठी पोलिस यंत्रणा सक्रिय असताना, त्यांच्या कन्या वैशाली देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वैशाली देशमुख यांनी सांगितले की, “माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा. इतके दिवस पोलीस यंत्रणा काम करत असताना आरोपी स्वतः सरेंडर करत आहेत, तर मग पोलीस त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ का घेत आहेत? आम्हाला न्याय कधी मिळणार?” त्याचसोबत त्यांनी मागणी केली की, तीन फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करुन माझ्या वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे.
वाल्मिक कराडने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी केला, ज्यात त्याने केज पोलीस स्टेशनवर खोटी खंडणीची फिर्याद दाखल करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये कराड म्हणाला, “मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर करत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे मारेकरी असतील, त्यांना अटक करुन फाशी देण्यात यावी. राजकीय द्वेषामुळे माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी ठरलो, तर न्यायदेवता जे निर्णय घेतील, ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.”
वाल्मिक कराड, परळी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक, गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी घेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजकारणात तो एक प्रमुख व्यक्ति म्हणून ओळखला जातो, आणि मुंडे पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या सरकारी तसेच सामाजिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन कराडच करत असे. परंतु, सध्या वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल झाले असून, त्याचा पोलिस तपास सुरु आहे.