माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अंत्यसंस्कार यावरून राजकारण तापले आहे. काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जमीन दिली न गेल्याबद्दल आणि त्यासाठी दिरंगाई केल्याबद्दल तीव्र सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, निगम बोध घाटावर झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्कारावरही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. यावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, काँग्रेसचे लोक केवळ फोटो काढण्यासाठी येतात, परंतु डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनासाठी कोणीही उपस्थित नव्हते.
कॉंग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारक आणि अंत्यसंस्कारावर प्रश्न उपस्थित केल्यावर भाजपाने त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस फक्त राजकारण करत आहे आणि यापूर्वीच डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. तसेच, निगम बोध घाटावर झालेल्या अंत्यसंस्कारावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करून फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं.
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर हल्लाबोल करत म्हटलं की, काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे शासकीय इतमामाने अंतिम संस्कार केले गेले आहेत. ज्या स्मारकाबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला, त्या स्मारकासाठी सरकार तयार आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये काही अडचणी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करणे शक्य झाले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेसवर हल्ला करत सांगितले की, काँग्रेस सरकारच्या काळात देशातील अनेक माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे अंत्यसंस्कार एकता स्थळावर केले गेले, जिथे त्यांचे स्मारक देखील उभारले गेले. त्यांनी स्पष्ट केलं की, जर काँग्रेसला इच्छा असती तर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर त्या ठिकाणीच अंत्यसंस्कार केले जाऊ शकले असते, कारण ती जागा पूर्वीच निर्धारित केली गेली आहे आणि दोन स्मारकांसाठी जागा उपलब्ध आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचा अपमान झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे वाहन कोणत्याही ताफ्यामुळे थांबले नाही, तसेच निगम बोध घाटावर त्यांच्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली गेली. काँग्रेस फक्त राजकारण करत आहे आणि त्यांच्या नेत्यांनी तिथे फक्त फोटो काढण्यासाठी हजेरी लावली, पण डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचं विसर्जन करताना काँग्रेसचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता.