मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच कोल्हापुरात पोहोचले. जिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक कारवाई करतील आणि कोणालाही सोडणार नाहीत, असा इशारा दिला.
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यात तणाव निर्माण झाला आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला. यावर मंत्री पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सहा दिवसांच्या अधिवेशनात चर्चेसाठी चार ते साडेचार तासांचा वेळ दिला. सर्वपक्षीय नेत्यांनी आपले विचार मांडले. फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात फडणवीस काय निर्णय घेतात, ते त्यांच्या हातात आहे, आणि त्यांनी कधीही पक्षीय भेदभाव न करता निर्णय घेतला आहे.”
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक अभिनेत्रींची नावे घेतली, ज्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नावही समाविष्ट होते. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत, धस यांच्याकडून जाहीर माफी मागण्याची मागणी केली. या प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिले.
मंत्री पाटील म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी स्त्रीच्या चारित्र्याची आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची पक्की काळजी घेतली. या प्रकरणात अभिनेत्रीचे नाव जोडणे सुरेश धस यांना शोभत नाही. मी त्यांच्याशी लवकरच दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहे. त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की, त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की किंवा बदनामी होईल, असे शब्द वापरू नयेत. प्राजक्ता माळी यांनी काल पत्रकार परिषदेत आपली भावना व्यक्त केली आहे. म्हणून, धस यांना विनंती करतो की, तुम्ही पक्षाचे आमदार आहात, तुम्ही असे वर्तन करू नये.