मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. सीआयडीकडे तपास सोपविल्यानंतर, पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांना सीआयडीचे अधिकारी भेटले नाहीत, ज्यामुळे ते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडी आणि विरोधकांनी या प्रकरणावर राज्य सरकारवर टीका केली आहे, तसेच बीडमध्ये विरोधकांनी भेटी आणि मोर्चे आयोजित केले आहेत. यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड गुन्हेगारीच्या दृष्टीने खूपच वाईट बनले आहे. १९ दिवस झाल्यानंतरही अटक का झाली नाही? वाल्मिक कराड बेपत्ता आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्या हातात बंदुक घेऊन फोटो आहे. हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देणे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा. अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
अजितदादा परखड बोलतात, पण त्यांना संरक्षण दिलं जातंय, हे तुम्हाला योग्य वाटतं का? महाराष्ट्रात काय चाललं आहे? मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवावी. ते म्हणाले की, कराड याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी का झाली नाही, आणि त्यांचा राजीनामा का घेतला नाही? राज्यातील बीड पॅटर्नला रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे, सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणात आरोपींचा थेट संबंध असल्याचे दिसून येते. संभाजीराजे यांनी आरोप करताना सांगितले की, आरोपीची कंपनीत भागीदारी आहे आणि त्यांचा सातबारा पुढे आलेला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री तोंडघाशी पडतील कारण ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तुम्ही तंगडी वर करून पडताल. मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत आणि त्याचे रक्षण करण्याचे काम मुख्यमंत्रीच आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.