बांगलादेशमध्ये परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. अल्पसंख्याक हिंदू समुदायासह इतर धार्मिक समुदायांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल केंद्र सरकारला कठोर सवाल केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “बांगलादेशात इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला, इस्कॉनच्या प्रमुखाला अटक करण्यात आली, आणि रोज हिंदूंवर अत्याचार होतात. तरीही आपण गप्प का आहोत? आपल्या विश्व गुरूने हे अत्याचार पाहिले तरी गप्प आहे. मोदीजी युक्रेनमधील युद्ध एका फोनवर थांबवले, तर हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बांगलादेशात भूमिका घेतली पाहिजे.”
तसेच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावर टीका केली आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा न करता त्यांना दुर्लक्षित केलं जात आहे आणि चर्चा चुकीच्या दिशेने वळवली जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत. “दोन-तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशचा संघ भारतात आला होता. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना, त्या संघासोबत खेळणं कितपत योग्य आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. पण त्यावर अजूनही कोणतेही उत्तर मिळालं नाही.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, भाजपचं हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतं सीमित आहे. “हिंदू मते म्हणजे केवळ मतं नाही, त्यांच्यात भावना आहेत.” वन नेशन वन इलेक्शन योग्य आहे, पण भाजपचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतांसाठी आहे का? सत्तेत आल्यानंतर भाजपने मंदिरांची तोडफोड केली. मंदिर कुठे सुरक्षित आहे? बांगलादेशात नाही आणि मुंबईतही नाही. मुंबईतील मंदिरांची तोडफोड रोखण्यासाठी भाजपचे हिंदुत्व कुठे आहे? असे प्रश्न त्यांनी विचारले.