Posted in

“राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे एकूण 231 उमेदवार निवडून आले, त्यामध्ये भाजपला 132 जागा मिळाल्या, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाने 57 जागा जिंकल्या, तर अजित पवार यांच्या गटाला 41 जागा मिळाल्या. दुसरीकडे, महाविकास आघाडीतल्या तीनही घटक पक्षांना मिळून केवळ 50 जागा मिळाल्या.

पाच डिसेंबर रोजी राज्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राज्यात उत्सुकतेचे वातावरण होते. कुणाला कोणते खाते मिळणार? आणि विस्ताराची वेळ कधी येईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी अपडेट समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी नागपुरात घडामोडींना गती मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने नागपुरात ४० बंगले सज्ज करण्यात आली आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था पूर्ण झाली आहे आणि मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या तयार आहेत. मंत्र्यांची यादी जाहीर होताच, त्यावर नेमप्लेट लावली जाईल. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्यात आली आहेत.”

दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असला, तरी कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळणार याविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.