Posted in

“अजित पवारांच्या मताशी सहमत; सुनंदा पवार यांनी युवा नेतृत्वावर दिला भर म्हणाल्या..”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी झालेल्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्ष विभागला होता. अजित पवार यांनी शरद पवार यांना थांबण्याचा सल्ला देत, पक्षाचे नियंत्रण नवीन लोकांवर सोपवण्याची मागणी केली होती. आता रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही अजित पवार यांच्या मताशी सहमती दर्शवली असून, पक्षाची जबाबदारी युवा आमदारांवर देण्याचा विचार व्यक्त केला आहे, ज्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी मिळेल असे त्यांनी सांगितले.

सुनंदा पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य करताना ती भेट कौटुंबिक असल्याचे स्पष्ट केले. पवार साहेबांचा ८५ वा वाढदिवस असल्याने अजित आणि सुनेत्रा पवार आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. सुनंदा पवार म्हणाल्या, “दरवर्षी आम्ही भेटतो, ती भेट राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये.” तसेच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का, याबद्दल काही सांगता येत नाही, परंतु “माझी इच्छा आहे की ते एकत्र यावेत.”

सुनंदा पवार यांनी शरद पवार यांच्या सत्तेसोबत जाण्याच्या निर्णयावर सांगितले की, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. कारण त्यांना ६० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. दोघांनी एकत्र यावे, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. पक्षाकडून रोहित पवार यांना मोठी जबाबदारी मिळावी का? त्यावर त्या म्हणाल्या की, रोहित पवार आणि अन्य युवा आमदारांना पक्षात मोठी जबाबदारी दिली पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी दिली तर नवीन विचार आणि युवा नेतृत्वामुळे पक्षाला पुन्हा उभारी मिळू शकते.