महाविकास आघाडीला विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली असून, महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. आझमी म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी ठरवायचं आहे की त्यांच्यासोबत राहायचं की नाही. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या बाबरी मशिदी संदर्भातील ट्विटमुळे आणखी वाद चिघळला आहे.
महाविकास आघाडीच्या सेक्युलर तत्त्वावरून समाजवादी पार्टीने आपले मत व्यक्त केले आहे. अबू आझमी यांनी म्हटले की, महाविकास आघाडीमध्ये हिंदू-मुस्लिम भेदभाव न करता एकजूट होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर स्पष्टपणे हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि राजकारणात धर्म आणला हे चुकीचं आहे. सहा डिसेंबरला बाबरी मशिदीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य, ज्यात त्यांनी शिवसैनिकांच्या कृत्याचे स्वागत केले, हे आघाडीतील सहकार्याला धक्का देणारे ठरले. अशा परिस्थितीत समाजवादी पार्टी महाविकास आघाडीचा भाग राहू शकत नाही. अस अबू आझमी म्हणाले.
तसेच त्यांनी महाविकास आघाडीतील नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे आवश्यक होते. महाविकास आघाडीला सेक्युलर राहण्याचा दावा करायचा असेल तर त्यांना सांप्रदायिक मतविचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. अशी वक्तव्य करणाऱ्या पक्षासोबत समाजवादी पार्टी राहू शकत नाही, असही ते म्हणाले.