महायुतीच्या नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. यामध्ये शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील, भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. याआधी भाजप नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यावर शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याच म्हटलं जातं. पाच तारखेला संध्याकाळी आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
महायुतीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर आज दुपारी एक बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर आज संध्याकाळी महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
शपथविधी सोहळ्यासाठी आमदारांच्या बैठकीची व्यवस्था, गेट्स, आणि निमंत्रित व्यक्तींना सुविधा मिळवण्यासाठी एन्ट्रीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी तसेच त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आझाद मैदानावर आलो होतो. असे संजय शिरसाट यांनी सांगितले. “पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता एक चांगला सोहळा पहायला मिळेल.” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी शिवसेना विरोधी पक्षात बसणार असं टि्वट केल. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत “कोण अंजली दमानिया? आम्ही प्रत्येकाला महत्त्व देत नाही” असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दिल्लीतील महाशक्ती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला, त्यावर शिरसाट यांनी राऊतांना मित्रत्वाचा सल्ला देत, “लोकांना कंटाळा येईल एवढं बोलू नका” असे सांगितले. गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना एक वर्षांसाठी मुख्यमंत्री करा. त्यावर शिरसाट म्हणाले की, “हा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल.” मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल शिरसाट म्हणाले की, “महायुतीच्या नेत्यांना याच उत्तर 4 तारखेला संध्याकाळी मिळेल.”