Posted in

“राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले असतानाही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज दुपारी दिल्ली जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं मिळाली होती, त्यामुळे आता अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळणार, हे बघण महत्वाचं ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका आज रद्द करण्यात आल्या आहेत. शिंदे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आराम करावा लागणार असल्यामुळे ती बैठक रद्द करण्यात आली आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील त्यांच्या घरी असणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी असलेल्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपचे नेते पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, राजेंद्र राऊत आणि अनिल बोंडे हे सर्व नेते फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर उपस्थित आहेत. येथे भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होत आहे.

महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार आणि मुख्यमंत्री कोण असणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह ठरवतील, त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं सांगितलं. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील आणि दिल्लीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्त झाल्याची माहिती मिळाली आहे, मात्र यासंबंधी कोणतीही घोषणा अजून झालेली नाही.