महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून, महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाला मिळून फक्त 50 जागा मिळाल्या. तर भाजप 132 जागांवर विजयी होऊन राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता, 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असून, या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
नव्या महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत. विशेष म्हणजे, लाडक्या बहिणींना शपथविधी सोहळ्यासाठी रेड कार्पेट टाकून निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी अंदाजे 40 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, पाच डिसेंबरला नव्या महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र नव्या मुख्यमंत्र्याचे नाव अद्याप घोषित केलेले नाही. भाजपने महायुतीत मोठे यश मिळवले आहे त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेने आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. मात्र भाजपने अजून गटनेत्याची निवड केलेली नाही. भाजपच्या गटनेत्याची निवड 4 डिसेंबरला होणार आहे आणि त्यासाठी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.