Posted in

“फडणवीसांच्या ‘महा’ शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे दिग्गज, अंबानींसह अनेक मोठ्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती”

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याला 40,000 नागरिकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे, आणि खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवर देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

अंबानी कुटुंबीय, देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीय, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, निलम गोरहे, नारायण राणे, उदयनराजे भोसले आणि राम नाईक. यातील सर्व मान्यवर शपथविधी सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून पहिल्या रांगेत बसणार आहेत.

मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, आणि अनिल काकोडकर. हे सर्व दिग्गज शपथविधी सोहळ्यात दुसऱ्या रांगेत उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, महायुतीच्या नव्या सरकारमध्ये जुना पॅटर्न कायम ठेवला गेला आहे. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्रिपदाबद्दल सस्पेन्स होता, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची मनधरणी यशस्वी झाली आहे आणि ते देखील आज शपथ घेणार आहेत. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तीनही प्रमुख नेते आज शपथ घेणार आहेत.