महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली आहे. ज्यामुळे ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर महायुतीने पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे, अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले, त्यांच्या सहकार्यामुळे सरकार स्थापनेसाठी मदत मिळाली असल्याचे सांगितले.
महायुतीने राज्यपालांना पत्र दिलं असून, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी 5 डिसेंबर रोजी सायं 5 वाजता शपथविधीसाठी वेळ दिला आहे. महायुतीने घटक पक्षांच्या सहीचे पत्र राज्यपालांना सादर केले आहे. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आहे. त्याबद्दल मी शिंदे यांचे आभार व्यक्त करतो, अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांनी देखील त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडेल, आणि तिन्ही पक्षाचे नेते त्यात सहभागी होतील. शपथविधीला किती लोक सामील होणार याची माहिती आज संध्याकाळपर्यंत दिली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद ही तांत्रिक बाब असल्याचे सांगत, आतापर्यंत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घेतले आहेत. मी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मी व्यक्त करतो. जी आश्वासनं आम्ही दिली आहेत, ती पूर्ण केली जातील आणि इतर मंत्र्यांबाबत निर्णय बैठकीत घेतला जाईल.