Posted in

मावळ प्रकरणामुळे ‘केडरबेस’ पक्ष असलेली भाजपची प्रतिमा डागाळली?… बंड करणाऱ्यांना पक्षाचा आतूनच पाठिंबा?..

मावळ:(प्रतिनिधी) पक्षनिष्ठा काय असते? याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून काँग्रेसकडे मावळात सध्या कॉंग्रेसकडे पहावं लागेल. पक्षाची शिस्त मोडल्याने मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माउली दाभाडे यांच्यावर पक्षाकडून थेट कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे मावळ विधानसभा मतदारसंघ महायुतीत आपल्या वाट्याला न आल्याने मावळमधील भाजपच्या कारभाऱ्यांनी चक्क आपल्या पदांचा राजीनामा देऊन पक्षालाच थेट आव्हान दिले. त्यातही या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा न देता फक्त पदांचा राजीनामा देत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची स्टंटबाजीदेखील केली असल्याची चर्चा मावळात सर्वत्र सुरु आहे.

एवढी मोठी घटना घडून गेली. मात्र, प्रदेश भाजपकडून याबाबत साधी प्रतिक्रिया देखील आलेली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या घटनेबाबत साधा चकार शब्द देखील उच्चारण्यात आलेला नाही. दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा म्हणतात बंडखोरी थांबवा. परंतु, या प्रकरणात पक्षश्रेष्ठी यांची चुप्पी म्हणजे बंड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आतूनच पाठिंबा आहे काय? असा सवाल उपस्थित होताना दिसतो.

राष्ट्रवादी हा महायुतीचा घटक पक्ष आहे. आ. शेळके हे महायुतीतील उमेदवार आहेत. असे असताना महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केलेल्या ‘राष्ट्रवादी’च्याच बापूसाहेब भेगडे यांना मावळ भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी स्थानिक भाजपच्या माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाची शिस्त मोडत आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

मावळ भाजप आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही, तोपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करू नये, अशी भूमिका आमदार शेळके यांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. भेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भेगडे यांच्यासह मावळ भाजपकडून बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता वाटत नव्हती. परंतु, बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करताच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पदांचे राजीनामे देऊन त्यांना पाठिंबा दिला. अर्थात त्यांनी अजून पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. राजीनामे दिल्यानंतर तत्काळ बैठक घेऊन, या नेत्यांनी बापू भेगडे यांचा प्रचार करण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे महायुतीत याचे राज्यभरात मोठे पडसाद उमटू शकतात. त्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हे प्रकरण तातडीने हाताळणे क्रमप्राप्त ठरते.

ज्या पद्धतीने काँग्रेसने त्वरित पक्षाचे ज्येष्ठ नेते दाभाडे यांचे निलंबन करीत मागच्यांना सावधानतेचा इशारा दिला, तसं धाडस भाजपचे पक्षश्रेष्ठी मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून दाखवतील काय? सद्यस्थितीत तरी, भाजपकडून अशा हालचाली होताना दिसत नाहीत. नैतिकता, सुसंस्कृतपणा, साधनसुचिता, विचाराशी बांधिल असलेला आणि केडरबेस पक्ष म्हणून भाजपची आजपर्यंतची ओळख आहे. मात्र, अशा प्रकरणामुळे भाजपची असलेली ही ओळख पुसट बनत चालली आहे, अशी कुजबुज राजकीय जाणकारांमध्ये सुरु आहे