Posted in

भाजपाची प्रचारात आघाडी; जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी?  

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजला असून भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे उमेदवार यादी जाहीर करून भाजपाने आघाडी घेतली असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच घोडं जागा वाटपावरच अडलं आहे. त्यामुळे कोणताही विधानसभा मतदारसंघात  महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. तर भाजपने उमेदवार निश्चित करून विधानसभा निवडणुकीत आघाडी घेत प्रचाराचे नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवला असून चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. आणि आता गुरुवारी 24 ऑक्टोबरला चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज चंद्रकांत पाटलांकडूनच दाखल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे कोथरूड मधील महायुतीचा उमेदवार ठरला असताना दुसरीकडे मात्र  कोथरूड मतदार संघ नेमका कोणाला सुटणार याबाबत देखील महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेला नाही. हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला येणार असल्याचे सांगण्यात येत असला तरी अद्याप त्यावर शिक्का मोर्तब झालेलं नाही.

जरी हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला तरी उमेदवारीसाठी अंतर्गत गटबाजी ठाकरे गटांमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे पृथ्वीराज सुतार यांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे देखील उमेदवारीच्या रेस मध्ये आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडी मधून या ठिकाणी बंडखोरी होण्याची देखील शक्यता न करता येत नाही. एकीकडे भाजपाचा प्रचाराचा आरंभ झाला असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये अद्यापही धाकधूक सुरू आहे.