ही दोस्ती तुटायची नाही…

0

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांमधील मैत्रीचे किस्से संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. सध्या साताऱ्याचे खासदार असलेल्या श्रीनिवास पाटील यांचा जन्म साताऱ्यातील कराड येथे झाला. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आपली पदवी पूर्ण करून पुढे पुण्यातच त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण घेतले.

एखाद्या राजकारण्यापेक्षा संपूर्ण वेगळा स्वभाव ही श्रीनिवास पाटलांची खासियत. मनमोकळे सहृदयी श्रीनिवास पाटील हे त्यांच्या वाचनाच्या दांडग्या सवयीमुळे एक विद्वान म्हणून सर्वदूर परिचित आहेत. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून श्रीनिवास पाटील यांनी काम केले असून फक्त शरद पवारांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी साताऱ्यातील दिग्गज नेते छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ह्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरले होते.

श्रीनिवास पाटील यांनी स. प. महाविद्यालयात असतांना आयुष्यातील पहिली निवडणूक लढवली होती. याच काळात त्यांची शरद पवार यांच्याशी चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीचे किस्से आज देखील संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत असतात. शरद पवारांच्या एका फोननंतर चक्क कलेक्टरपद सोडून श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. सातारा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी देखील श्रीनिवास पाटलांसाठी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली होती. तेव्हापासून ते आजतागायत शरद पवारांच्या साथीने श्रीनिवास पाटलांचा राजकीय प्रवास असाच सुरू आहे.

एक सच्चा, निष्ठावान व मैत्रीला जगणारा माणूस म्हणून श्रीनिवास पाटलांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.