
“हा” पुरस्कार परत एकदा मिळवून सुप्रिया ताईंनी मारला षटकार…
मुंबई : महाराष्ट्रात पवार कुटुंबीतील नेते हे राजकारणातील खंदे नेते म्हणून ओळखले जातात. त्यापैकी शरद पवार व सुप्रिया सुळे यांना दिल्लीचा अनुभव खास आहे. अनेक वेळा दोघांनीही राज्यातील व देशातील सामन्यांच्या समस्यांना, प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली आहे. तसेच राजकारणातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे, त्यांना अनेक मान-सन्मानही त्यांना प्राप्त झाले आहेत.
असाच एक मानाचा, चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई- मॅगझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (२० मार्च रोजी) बहाल केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
विशेष म्हणजे, त्यांना सलग सहाव्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला, असे फाउंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळवले आहे. हा पुरस्कार फाऊंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येतो.
दरम्यान, १६व्या लोकसभेत सुळे यांची सभागृहात ९६% उपस्थिती होती. त्यांनी १५२ चर्चासत्रांत भाग घेतला. एकूण ११८६ प्रश्न विचारले व २२ खासगी विधेयके मांडली. तसेच चालू १७व्या लोकसभेतही त्यांची उपस्थिती ८९% आहे व १२२ चर्चासत्रांत त्यांनी भाग घेतला आहे. त्यांनी सभागृहात २८६ प्रश्न विचारले असून, चार खासगी विधेयके मांडली आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.