‘सामना’मधून शिवसेनेने उपटले भाजपाचे कान!

0

“लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते , पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?,” असा सणसणीत सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात विचारण्यात आला आहे.

राज्याच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपलं. हे अधिवेशन मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणामुळे फार गाजलं होतं. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित समावेशामुळे विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सचिन वाझे यांना निलंबित करुन अटक करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. अनेकवेळा सभागृह बंद पाडलं. यावरुन शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे.

‘अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. शिक्षण, कायदा सुव्यवस्थेचे, इतरही काही प्रश्न आहेत. अर्थसंकल्पात एक लाख कोटीची महसुली तूट आहे. असे एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. त्यावर बोलायचे नाही. लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?’ असा सवाल देखील शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात राजकारण करणाऱ्या फडणवीस यांनी अन्वय नाईकचे प्रकरण दाबले होते, असा देखील आरोप यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात देखील भाजपाच्या उच्चपदस्थ नेत्यांनी दबावतंत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्याविषयी राज्यातील भाजपा नेते काही बोलत का नाही? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.