सांगली-जळगावातील ‘करेक्ट कार्यक्रम’ ही तर नांदी…

0

मुंबई : सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर, जळगावात देखील भाजपच्या नाकावर टिच्चून महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचा निवडून आल्याने, राज्यात भाजपच्या हातून एकेक गड निसटत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

यावरून सामनातून, “नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली, जळगावात झालेला हा सत्ताबदल केवळ नांदी आहे, राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल! शेवटी सत्ता हेच हत्यार असते,” अशी टीका करण्यात आली आहे.

तसेच, “महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून आता लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत. त्यांच्या मनातले भय नष्ट झाले आहे. ई.डी., आयकर विभागाचे भय सामान्य माणसांना असण्याचे कारण नाही. आतापर्यंत हे भय दाखवूनच भाजपने राजकीय स्वार्थ पाहिला. पोलीस यंत्रणेचा वापर करून ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकल्या,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

खडसे व महाजन यांच्या वितुष्टावरूनही शिवसेनेने गिरीश महाजनांवर तोंडसुख घेतले आहे. “खडसे यांनी भाजप सोडला, त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच.” असे म्हणताना, ‘महानगरपालिका निवडणुकीत इकडचे-तिकडचे लोक फोडून महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. मात्र महाजनांच्या एकतंत्री आणि अहंकारी कारभाराला, त्यांचेच नगरसेवक कंटाळले. महाजनांचा अहंकार इतका वाढला की, बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. अखेर त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे,’ अशी घणाघाती टीका सामनाच्या अग्रलेखातून महाजनांवर केली गेली आहे.

“महाराष्ट्रात 105 आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही. सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते. भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. या अनुभवांतून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच,’ असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.