शरद पवारांची दिल्लीत मिटिंग झाली आणि रोहित पवारांनी फडनवीसांना घेरलं!

0

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुखांवर, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरुन, राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शरद पवारांनी दोन पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप तथ्यहीन असून, राज्य सरकार अस्थिर करण्याचा डाव रचला जात असल्याचे सांगितले.

दरम्यान, फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत, गृहमंत्र्यांच्या चौकशीची मागणी केली. तसेच, त्यांनी गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, जोवर त्यांचा राजीनामा येत नाही, तोवर महाराष्ट्रात भाजपकडून निदर्शने चालू राहतील, असे स्पष्ट केले. राज्यातल्या इतर पक्षांनी देखील महारष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, राज्यपालांकडे जाऊन केली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी, फेसबुक पोस्ट करीत विरोधकांवर टीका केली आहे.

 

याबाबत रोहित पवारांनी टि्वट करून, ‘अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं,’ असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

‘गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना, त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले.’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

‘केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं.’ अशा शब्दांत रोहित पवारांनी विरोधकांना फटकारलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.