
वाझे प्रकरणावरून शरद पवारांनी सोडले मौन…
दिल्ली : राज्यातल्या घडामोडींनी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रतिमेला याचा फटका बसत आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण व सध्याचे सचिन वाझे प्रकरण यांवरून राज्याच्या गृहखात्यावर व सरकारवर टीका, आरोप यांची बरसात होत आहे. त्यामुळे ही प्रतिमा जपण्यासाठी शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ वर बैठक बोलवावी लागली.
तसेच राज्यातील घडामोडींना घेऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बैठक बोलावली होती, तसेच मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली होती. दरम्यान, यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना राज्यात उधाण आले होते. ‘गोविंदबाग’ या पवारांच्या बंगल्यामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, पवारांनी सचिन वाझे या प्रकरणाबाबतीत बोलण्यास नकार दिला होता. परंतु, दिल्लीत त्यांनी या प्रकरणावरचे आपले मौन सोडले आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्रालयाची कामगिरी चांगली आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. “एका पोलीस निरिक्षकामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर परिणाम होईल असं मला वाटत नाही” असं पवार यांनी म्हटले आहे.
Read Also