
वाझे आणि हिरेन प्रकरणात भाजप नेत्याच्या कार “कनेक्शन”ची चर्चा
मुंबई : मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणामुळं गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं एकंदरीत वातावरण चांगलचं तापलेलं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझेंना एनआयएने अटक करून, रविवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले असून, तिथे त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली गेली आहे. तसेच स्फोटक गाडीच्या संबंधात अधिक तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने मंगळवारी एक मर्सिडीज जप्त केली आहे.
या काळ्या रंगाच्या मर्सिडीजच्या (एमएच १८-बी आर-९०९५) डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती, जी गाडी वाझे वापरत होते. मात्र, जप्त केलेल्या या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
जानेवारीतच या गाडीची ऑनलाइन विक्री ‘कार २४’ या वेबसाईटवरून झाल्याचे समजते आहे. या मर्सिडीजचे मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार आहेत. त्यांच्या फेसबुकवरच्या एका फोटोमध्ये ही कार मागच्या बाजूला असून, त्याच फोटोत ते त्यांचे मित्र देवेन हेमंत शेळके याच्यासोबत दिसत आहेत.
देवेन हेमंत शेळके यांचे फेसबुक प्रोफाईल पाहिल्यावर, ते धुळ्याचे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे त्यावर लिहिले आहे. त्यामुळे आता या कारचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष संबंध भाजप पदाधिकाऱ्याशी आहे, की काय याबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचवेळी यासंदर्भात सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी फोटो ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, १७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. ती कार वाझे हेच वापरत असल्याचा एनआयएनला संशय आहे. आत ही गाडी जप्त करण्यात आल्याने ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.