
राज्यभरात रात्रीची जमावबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश !
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती झाली तर संबंधित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची मुभा त्या जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील जळगाव जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत.
२८ आणि २९ तारखेला येऊ घातलेल्या होळी व धुलीवंदन या सणांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जमावबंदी होऊ शकते, ही भीती लक्षात घेता, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी जिल्हाभरात संपूर्ण लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ज्या जिल्ह्यात लॉकडाऊनची आवश्यकता भासेल तिथे कडक लॉकडाऊन लावा, अशी सूचना देताना लॉकडाऊनचा निर्णय तडकाफडकी न घेता, जनतेला पूर्वसूचना देऊन घेण्यात यावा, असा सबुरीचा सल्ला देखील दिला आहे.
मला लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण वाढत्या रुग्णांच्या आकड्यांना बघता, भविष्यात आरोग्य सेवांवर ताण येऊ नये या दृष्टीने मला कठोर पाउले उचलावी लागतील. सध्या हे निर्बंध लावले असून भविष्यात अजून कठोर पाउले उचलावी लागू नये यासाठी जनतेने नियमांचे पालन करावे असे आवाहन मी याप्रसंगी करतो, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.