
मोदी सरकारकडे अजितदादांनी केली “ही” मागणी
राज्यात आणि खासकरून पुण्यात कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, पुण्यातील 18 वर्षांवरील नागरिकांनाही कोरोना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार केंद्र सरकारकडे करणार आहेत. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीरंग बारणे यांनी यामध्ये लक्ष घालून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला हा प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.
“महाराष्ट्रातील पुण्यासह अनेक राज्यातील ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीचा फैलाव अधिक आहे व त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, तिथे अशाप्रकारचा धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांसाठी तातडीने लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा व त्याकरता संबंधित राज्यांना अधिकाधिक लसीचा डोस उपलब्ध करुन देण्यात यावा” अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यात १ लाख १० हजार ४८५ रुग्ण असून, ही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्रशासनाने कठोर पावलं उचलत, अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन देखील केला आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत.
राज्यात शुक्रवारी १५ हजार ८१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात ५६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३१ % एवढा आहे. राज्यात काल ११,३४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९% एवढे झाले आहे.
दरम्यान, पुण्यात वाढत्या कोरोना साथीच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी लागू केली गेली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हॉटेल आणि मॉल रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.