
मोठी बातमी! लसीकरणाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन, कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता असताना, या पार्श्वभूमीवर आता देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
देशात महाराष्ट्रासह, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असताना, अनेक राज्यांमध्ये जास्त कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या शहरांत, निर्बंध कडक केले असून, काही ठिकाणी ठराविक कालावधीसाठी लॉकडाऊन देखील केले गेले आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आज कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून, देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे.
आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. “देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल. या लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी आपल्या नावांची नोंदणी करावी,” असे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले. तसेच, “भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. तसेच भारतात अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत,” असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. यामध्ये देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.