
माणुसकी..दीड लाखाचे बिल भरण्यासाठी शेती गहाण; डॉक्टरांनी रक्कम दिली परत!
पाचोरा (जळगाव) येथील मोंढाळा रस्त्यावर शहरातील काही डॉक्टर मित्रांनी एकत्रित येऊन “नवजीवन कोविड सेंटर” सुरू केले. सध्या हे रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे कारण माणुसकीचे दर्शन दाखवत डॉक्टरांनी दोन रुग्णांचे बिल माफ केले. अशा अडचणीच्या काळात कोणीतरी माणुसकी दाखवत मदतीचा हात देतो ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे डॉक्टरांचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.
पाचोरा जळगाव येथील मोंढाळा रस्त्यावर शहरातील काही डॉक्टर मित्रांनी एकत्रित येऊन “नवजीवन कोविड सेंटर” सुरू केले आहे. या हॉस्पिटलमध्ये तळई येथील आनंदा पाटील (वय ५५) व कोकिळा पाटील (वय ५०) यांना कोरोना झाल्यामुळे उपचारासाठी दाखल केले होते. या दाम्पत्याच्या कडे रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने; त्यांनी गावाकडे असणारी जमीन गहाण ठेवली. आणि रुग्णालयांमध्ये प्रामाणिकपणे बिल भरले. ही गोष्ट रुग्णालयातील डॉक्टरांना समजल्यानंतर त्यांनी मोठेपणा दाखवत रुग्णांची १ लाख ६० हजार रुपये रक्कम वापस दिली आहे.
डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. जीवन पाटील, अभिलाष बोरकर, नंदू प्रजापत यांनी तळई येथे जाऊन सरपंच भाईदास पाटील यांच्या समक्ष पाटील दांपत्यास संपूर्ण बिलाची रक्कम परत केली. या मानवतावादी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.