माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई : सध्या राज्यामध्ये सुरु असलेल्या अनेक हाय प्रोफाईल केसेसवरून राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. त्या प्रतिमेला सुधारण्यासाठीच्या अनेक उपायांसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अनेक बैठका होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी झालेली मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली हा यासाठी घेतलेला एक निर्णय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दरम्यान, या सर्व प्रकरणांत महाविकास आघाडीतल्या कुठल्या नेत्याचे नाव सर्वात जास्त चर्चिले गेले असेल, तर ते गृहमंत्री अनिल देशमुख यांचे. राज्याच्या गृहखात्याची धुरा सांभाळण्यात ते कमी पडले, असे सतत विरोधकांकडून सुनावले जात आहे. त्यांच्यावर टीकांचा भडीमार केला जात आहे. तसेच आता सचिन वाझे प्रकरणातील गुंतागुंत वाढत असल्याचं पाहून, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा येत्या काळात राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

मात्र, ते गृहखात्याचं काम व्यवस्थित करत असून, गृहमंत्री बदलण्याची गरज नाही, असं विधान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता खुद्द अनिल देशमुखय यांनीच, पाटलांच्या या म्हणण्याला एक ट्वीट करुन दुजोरा दिला आहे. आपल्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी यात स्पष्ट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये देशमुख यांनी लिहिलं आहे की, “आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात मा.पवार साहेबांची भेट घेतली व मागील २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी #ATS व #NIA ने केलेल्या तपासाची चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या, त्यात कोणतेही तथ्य नाही.” त्यामुळे राजीनाम्याच्या या चर्चांना गृहमंत्र्यांनीच पूर्णविराम दिल्याने, या चर्चा केवळ तोंडाच्या वाफा होत्या हेच म्हणावे लागेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.