
महाविकास आघाडीने टाटा रुग्णालयातील रुग्णांना केली मोठी मदत!
मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला देशभरातून मोठ्या संख्येने कर्करोगग्रस्त रुग्ण येत असतात. बऱ्याच रुग्णांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असते व उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. हा उपचार खर्च भागवताना सोबत आलेल्या नातेवाईक व आप्तेष्टांचे राहण्या व खाण्याचे बरेच हाल होतात. बऱ्याचदा तर नातेवाईकांना रुग्णांसह रस्त्यावर झोपण्याची नामुष्की ओढावते. पण महाविकास आघाडी सरकारने या सर्व गरजू रुग्णांचा प्रश्न सोडवला असून म्हाडाच्या वसाहतीतील १८८ पैकी १०० फ्लॅट्स हे टाटा मेमोरियल हॉस्पिटलला देण्यात येणार आहेत. या फ्लॅटसमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे. गृहनिर्माण विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे.
गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रुग्णालय, परेल यांच्या संयुक्त विद्यमाने कँन्सरग्रस्त रूग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी, याबाबत गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शैलेश श्रीखंडे, म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे व अन्य आधिकारी उपस्थित होते.
परेल शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ. बी. ए. रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समुह पुनर्विकास योजनेमधून मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण ३०० चौरस फुटांच्या या १८८ फ्लॅट्सपैकी शंभर फ्लॅट्सच्या चाव्या रुग्णालयाला देण्यात येणार असून या फ्लॅट्सच्या देखरेखीची जबाबदारी टाटा रुग्णालयाला सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या फ्लॅटसच्या देखभालीचा करार लवकरच करण्यात येईल, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या रुग्णांना सुपूर्द करण्यात येणार आहेत.