महाविकास आघाडची भरती आणि भाजपची ओहोटी सुरु

0

जळगाव : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर, आता जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेनं भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे.

आज जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यामध्ये जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली असून, त्यांना ४५ मतं पडली आहेत, तर पराभूत भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना ३० मतं पडली आहेत.

शिवसेनेच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत, “सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ करत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर केला, आता जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला आहे. आता राज्यात आणि स्थानिक संतशनमध्ये देखील फक्त महाविकास आघाडीचं सरकार ! तर, भाजपच्या ओहोटीला सुरुवात,” असं वक्तव्य केलं आहे.

जळगाव महानगरपालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे एकूण ७५ नगरसेवक आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या आधी भाजपचे २७ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले होते.  भाजपच्या २७ फुटलेल्या नगरसेवकांच्या मदतीनं व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं, शिवसेनेनं जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.

 

Read Also 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.