महाराष्ट्रात कोरोना झाला एक वर्षाचा, लढा अजूनही सुरूच

0

महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. त्या घटनेला काल एक वर्ष पूर्ण झालं. एका ट्रॅव्हल एजन्सीसोबत दुबईला फिरायला गेलेलं दाम्पत्य आणि त्यांना मुंबई एअरपोर्टवरुन पुण्याला घेऊन येणारा कार चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आजची राज्याची परिस्थिती अशी आहे की, आजही महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या असलेलं राज्य आहे. आजमितीला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख १९ हजार ७२७ वर पोहोचली असून, ५२ हजार ४७८ जणांचा मृत्यू आणि २० लाख ६८ हजार ४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

९ मार्च २०२० रोजी राज्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील पत्नी आणि मुलीला देखील कोरोनाची लागण झाली होती. हे दाम्पत्य ४ फेब्रुवारीला दुबईला फिरायला गेलं होतं. यांच्यासोबत त्यांचा मुलगा नव्हता. २९ फेब्रुवारीला हे दाम्पत्य आपल्या मुलीसह पुण्यात परतलं. १ मार्च दाम्पत्यातील एका व्यक्तीला थोडेसे बरे वाटत नव्हते. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला. तेव्हा डॉक्टरांनी औषध देऊन आराम करण्यास सांगितलं. पुढेच तीन दिवस हा व्यक्ती घरी आराम करत होता. पण बरे वाटल्यानंतर हा व्यक्ती ५ मार्चला ऑफिसला गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ताप आला. तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा ताप येणं, ही चांगली गोष्टी नसल्याचं सांगितलं. दुबईहून आल्यामुळे डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या व्यक्तीने कोरोना चाचणी केली आणि त्यानंतर ९ मार्च हा व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर कळालं. राज्यात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यू १७ मार्च २०२० रोजी नोंद झाली.

मागच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ११ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जातोय का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाऊन, संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात काल ११ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार १३रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, आता उपलब्ध झालेल्या स्वदेशीय लसींमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. तरीही पंतप्रधानांनी देशातील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोनाचे सर्व निर्बंधांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.