महाराष्ट्रातील “हे” विद्यापीठ देणार शरद पवारांना “हा” सन्मान

0

सोलापूर : शरद पवारांची आत्तापर्यंतची ओळख म्हणजे धुरंधर राजकारणी, लोकनेता, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, मनमिळाऊ नेता अशी आहे. परंतु, आता त्यांची अजून एक ओळख होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राज्यसभा खासदार पद्मविभूषण शरद पवार यांना डी.लिट (डॉक्‍टर ऑफ लिटरेचर) पदवी देण्याचा ठराव संमत झाला आहे. त्यामुळे आता शरद पवार हे डॉ. शरद पवार म्हणूनसुद्धा ओळखले जातील.

सोलापूर विद्यापीठाने २०१४ मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सर्वप्रथम डॉक्‍टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. तसेच सोलापूर विद्यापीठाची पहिली डी.लिट. पदवी ही मा. सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली.

काल 15 मार्च रोजी विद्यापीठाची 23 वी सिनेट सभा झाली. यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डि. लिट पदवी देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीचे निवेदन संघटनेच्या वतीने विद्यापीठाला दिले गेले होते. त्याचा पाठपुरावा सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी केला. यावेळी सूचक म्हणून सचिन गायकवाड यांनी या विषय मंजुरीसाठी मांडला होता, तर सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यास अधिसभेने बहुमताने मान्यता दिली.

दरम्यान, शरद पवार यांना डी.लिट पदवी देण्यासाठीच्या विषयाला सिनेटमध्ये मंजुरी मिळाली असली, तरी पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव अकॅडमी कौंन्सिलला पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, तो विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडे जाणार आहे. तसेच तेथे मंजुरी मिळाल्यानंतर, तो राजभवनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राजभवनाकडून मान्यता मिळाल्यानंतर, त्यांचा पदवीप्रदान समारंभ पार पडणार असल्याची माहिती, सोलापूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. विकास घुटे यांनी दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.