मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून श्रद्धांजली

0

मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (९१) यांचं शनिवारी पुण्यात, त्यांच्या राहत्या घरी, रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे स्वागत करणारे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणारे मोघे काही वर्षांपासून आजारी होते. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होत असल्यामुळे गेली काही वर्षे ते व्हिलचेअरवरच होते. अश्या परिस्थितीही घरातल्या घरात व्हीलचेअरवर बसून ते नाटकातील स्वगतं आणि कवी सुधीर मोघे यांच्या कवितांचे सादरीकरण करत असत. त्यांच्या निधनामुळे नाटक, सिनेमातून अभिनयाचा ठसा उमटवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी भावना मराठी चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे. दरम्यान, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून, त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना काढले.

श्रीकांत मोघे यांचा ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे जन्म झाला होता. मोघे यांचं प्राथमिक आणि माध्यामिक शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं होतं. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. पुणे व मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ख्यातनाम नाटककार भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात गेले. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले. मुंबईत त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु.ल.देशपांडे यांचे ‘अंमलदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी ६० हून अधिक नाटके आणि ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अश्या ठिकाणांचा दौरा केला. श्रीकांत मोघे हे उत्तम नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता याबरोबरच उत्तम चित्रकार, वास्तुविशारद आणि उत्तम सुगम संगीत गायकही होते.

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु त्यांना अकादमीत प्रवेश मिळाला नाही. पुढे ‘चारुदत्त’ नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारामधले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी १९५६ मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली. ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे हे त्यांचे बंधू होत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत व अभिनेत्री प्रिया मराठे या सूनबाई होत.

एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु.ल.देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ मधील बोरटाके गुरुजी, त्याचबरोबर ‘दिल देके देखो’ या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती. ‘स्वामी’ मालिकेतील त्यांनी साकारलेल्या राघोबादादांच्या भूमिकेला रसिकांची दाद मिळाली. सांगली येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्याचबरोबर त्यांच्या नाट्यप्रवासावर आधारित त्यांनी लिहिलेल्या ‘नटरंगी रंगलो’ या आत्मचरित्राचे प्रकाशन ६ फेब्रुवारी २०१५ रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात झाले होते.

श्रीकांत मोघे म्हणेज एक अस्सल मोहरा. शहरी-ग्रामीण दोन्ही भूमिकांमध्ये सारखेच खुलून दिसणारे, स्वच्छ भाषा, स्पष्ट शब्दोच्चार आणि अभिनयात बौद्धिक चमक असे मोघे यांचे व्यक्तिमत्त्व होते. ‘प्रपंच’ पासून ‘सिंहासन’ पर्यंत चित्रपटांमध्येही त्यांनी विविध पद्धतीच्या भूमिका केल्या. गंभीर आणि गमतीदार या दोन्ही प्रकृतीचा अभिनय ते सारख्याच ताकदीने करीत असत. प्रायोगिक-आधुनिक रंगभूमीपासून तर ऐतिहासिक बाजाच्या नाटकापर्यंत सर्वत्र त्यांचा संचार असे. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीने आणि चित्रपटाच्या रुपेरी पडद्याने, आपला अजून एक प्रतिभासंपन्न आणि मराठी संस्कृतीच्या सर्व अंगांबद्दल मनस्वी आस्था असलेला, तिला अधिक संपन्न करणारा एक श्रेष्ठ कलावंत गमावलेला आहे.

श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००५-०६)
काशीनाथ घाणेकर पुरस्कार (२०१०)
केशवराव दाते पुरस्कार (२०१०)
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार (२०१०)
सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
गदिमा पुरस्कार (२०१३)
महाराष्ट्र सरकारचा २०१४ चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार

Leave A Reply

Your email address will not be published.