भाजपाला षडयंत्राला जसेच्या तसे उत्तर द्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे निर्देश

0

महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्षाकडून वारंवार होत असलेल्या बेछूट आरोपामुळे सरकारची व महाराष्ट्राची बदनामी होत असताना भाजपच्या या षडयंत्राला बळी पडू नका, अशी सूचना मुख् मंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना केल्या. सुमारे पावणेतीन तास ही बैठक चालली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे तात्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडील आयुक्तपद काढून घेत त्यांची गृहरक्षक दलात बदली करताच परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये वसूल करून देण्याचे आदेश दिले होते, असा उल्लेख परमबीर सिंह यांच्या पत्रात करण्यात आला होता.

परमबीर सिंह यांच्या या लेटरबॉम्बमुळे भाजप व सर्वच विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत.

 

भाजपाच्या आक्रमक आंदोलनामुळे सरकार थोडे बॅकफूटवर आले असून सरकारने आता बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे. परमबीर सिंह भाजपाचा बोलका पोपट असून हे महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी रचलेले मोठे षडयंत्र आहे, असे मत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आहे. फडणवीस दिल्लीला जाऊन आल्यानंतर एकाएकी हे प्रकरण समोर येतंय यावरून याची योजना कोणी आखले हे समोर येतंय, अशी देखील महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे.

पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंग प्रकरण, अर्णब गोस्वामी अटक, कंगना राणावत प्रकरण, धनंजय मुंडे व संजय राठोड प्रकरण, या सर्वच प्रकरणात भाजपाकडून बेछूट आणि खोटे आरोप केल्याचा व महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव रचला गेला आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे.

वर्षावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सर्व एकत्र येऊन भाजपाच्या कटकारस्थानाला सामोरे जाऊ असे उद्गार काढले असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी याला दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने फक्त राज्यातील तपास यंत्रणेच्या मार्फत चौकशी करावी असं काँग्रेसने म्हटलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.