फडणवीसांचे षडयंत्राच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारची एकजूट!

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या जोरदार आरोपांचे व टिकांचे बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ आणि त्यानंतर वर्षावर झालेल्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी याविषयी संताप व्यक्त केला. महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन करण्याचा फडणवीस यांचा डाव असून आता जशास तसे उत्तर द्यायला हवे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आपल्या सहकार्‍यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी पुढे जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचवेळी आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या अधिकार्‍यांना ओळखण्यात देखील कमी पडलो अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.

याचबरोबर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सरकारवर उघडपणे केलेल्या सनसनाटी आरोपांवरसुद्धा मंत्र्यांनी आगपाखड केली आहे. या अधिकार्‍यांनी केलेल्या आरोपामुळे सरकारची बदनामी झाली असून या आरोपांच्या आधारावर भाजप नेत्यांनी सध्या रान उठवले असल्याने या अधिकार्‍यांवर कडक कारवाईची मंत्र्यांनी जोरदार मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांनी केलेल्या या मागणीची दखल घेत तातडीने वरिष्ठ मंत्र्यांना वर्षा बंगल्यावर पाचारण होण्यास सांगितले. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांना वर्षावर बैठकीला बोलावल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेत.

मंत्रिमंडळाच्या कामकाजात सहकार्य न करणाऱ्या या बेशिस्त व घटनाद्रोही अधिकाऱ्यांची यादी सादर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील मुख्यमंत्र्यांना भेटले असून आपल्या व्यवस्थेत असलेल्या संघी अधिकऱ्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन राज्य गृह सचिव सीताराम कुंटे यांची परवानगी घेतल्याचा दावा केला असला तरी सीताराम कुंटे यांनी ही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भयंकर संतापले आहेत. महाविकास आघाडी सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा एकत्रितपणे सामना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.