
दिल्ली येथे झालेल्या महत्वाच्या मिटिंग नंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर जयंत पाटलांचे महत्वाचे विधान !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केली होती. पण गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना गृहमंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही अनिल देशमुखांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे, असं देखील जयंत पाटील म्हणाले. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.