जेव्हा पवार साहेबांनी केले मंत्र्यांना “एप्रिल फूल”

0

पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. या ५० वर्षातले त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आणि आठवणी, अनेक जणांकडून सांगितल्या जातात. तर असाच हा एक किस्सा पवार साहेब मुख्यमंत्री असतानाचा…

मुख्यमंत्री शरद पवार एकदा, सूटबूट आणि बंद गळ्याचा कोट, अशा पोशाखात मंत्रीमंडळाच्या बैठकीला आले. त्यांच्याचसारखा पोशाख घालून राज्यशिष्टाचार मंत्री जावेद खान हे देखील आले होते. दोघांचा एक सारखा पोशाख बघून जनसंघाच्या दोन मंत्र्यांना राहवेना. त्यांनी पवारांना यावरून छेडलं.

तेव्हा, मुंबई विमानतळावर कोणीतरी परदेशी राष्ट्रप्रमुख आले होते, त्यांच्या स्वागताला आम्ही दोघं गेलो होतो आणि तिथूनच थेट मंत्रीमंडळ बैठकीला आलो, असं पवारांनी सांगितलं. मात्र जनसंघाच्या दोन मंत्र्यांना विशेष उत्सुकता होती.

त्यांनी पवारांना आणखीन खोलात जाऊन विचारलं की, “मग तुमच्या दोघांचे कोट सारखे कसे?” पवार साहेबाना आली फिरकी घेण्याची लहर. त्यांनी मंत्र्यांना “राजभवनाकडून आम्हाला हा पोशाख मिळाला आहे. प्रत्येक मंत्र्याला तो दिला जातो. शपथविधी झाला की लगेच राजभवनाचा अधिकृत शिंप्याला आपलं माप द्यायचं असतं. तुंम्हाला मिळाला नाही का कोट?” असं सांगून प्रतिप्रश्न केला.

ते दोघे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात आले होते. पवार साहेबांनी सांगितलेली ही गोष्ट त्यांना खरी वाटली. त्यांनी थेट राज्यपालांच्या सचिवांना गाठले आणि राजभवनाच्या अधिकृत शिंप्याला भेटायचे असल्याचे सांगितले. शिंप्याला भेटून मंत्रीसाहेबांनी कोटाचे माप घेण्याचा आदेश दिला.

तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली होते. त्यांना हे दोन मंत्री राजभवनवर आलेलं कळालं. त्यांनी दोघांना चहापानाला बोलावून घेतलं आणि विचारलं, “आज इकडे कुठे?” मंत्री म्हणाले, “राजभवनाकडून मिळणाऱ्या बंद गळा कोटासाठी माप द्यायला आलो आहे.” राज्यपालांना आश्चर्य वाटलं, ”असे काही कोटबीट दिले जातात हे मला तर ठाऊक नाही.” असं त्यांनी दोघा मंत्र्यांना सांगितलं.

तेव्हा दोघा मंत्र्यांची नजरानजर झाली आणि त्यांना कळून चुकलं की आपल्याला पवार साहेबांकडून “एप्रिल फूल” बनवण्यात आलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.