केरळमधला कॉंग्रेसचा साथीदार आता शरद पवारांची देणार साथ

0

केरळ : देशातल्या ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशांतल्या विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. संबंधित राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष व राष्ट्रीय पक्ष यांच्या जोरदार प्रचाराकीय संघर्ष सुरु असून, एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी नेते सोडत नाहीयेत. त्याचबरोबर निवडणुकांआधी या राज्यांमध्ये आमदार व नेत्यांच्या गळत्यांनाही वेग आला असून, त्यामुळे या राज्यांमधले वातावरण चांगलेच तापलेले आहे.

दरम्यान, केरळमधली स्थितीही फारशी काही वेगळी नसून, केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पीसी चाको यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. अशातच आज ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असून, संध्याकाळपर्यंत एक पत्रकार परिषद घेऊन, यामध्ये ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

पीसी चाको यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटणार आहे. मी  काँग्रेस पक्षात जो काही संघर्ष केला, तो त्यांना सांगणार आहे. याचबरोबर मी सीताराम येच्युरी आणि गुलाब नबी आझाद यांच्याशीही बोलून पुढची दिशा ठरवणार आहे.

मी केरळ निवडणुकीमध्ये एलडीएफला पाठिंबा जाहीर करणार आहे. तसेच शरद पवारांशी बोलल्यानंतर राष्ट्रवादी प्रवेश करण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. केरळमध्ये दोन आघाड्या आहेत. एक काँग्रेसप्रणित आणि दुसरी डाव्यांची. मी आता काँग्रेस सोडल्याने स्वतःचे निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे. मी एलडीएफला उघडपणे पाठिंबा देऊ शकतो,” असे चाको यांनी सांगितले.

चाको यांनी केरळमध्ये लोकशाही पद्धतीने उमेदवारांची निवड झाली नसल्याचा आरोप काँग्रेसवर केला होता. यानंतर त्यांनी 10 मार्चला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी केरळ काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. केरळमध्ये लोकांना काँग्रेस पुन्हा सत्तेत हवी आहे, मात्र गटबाजीमुळे आणि चुकीच्या उमेदवारांना संधी दिल्याने त्यांना सत्ता काबीज करणे अवघड आहे, असे चाको यांनी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.