काँग्रेस घेणार बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी बैठक, राज्याबाबत हाय कमांड घेणार भूमिका

0

दिल्ली : परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि विरोधी पक्षाने सातत्याने लावून धरलेल्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत आला आहे . महाविकास आघाडीसाठी संकटमोचक असलेले शरद पवार, यांनी देखील या घटना प्रसंगानंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली. तसेच, हा राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या प्रकरणावरून दररोज नवे पुरावे-दवे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, दुरीकडे या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मालिन होत असून, महाविकास आघाडीला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने, राज्यातील आपल्या प्रतिमेकडे गांभीर्याने पाहण्याचे ठरवले आहे. कारण, महाराष्ट्रातल्या या घडामोडींवर काँग्रेस हायकमांड राहुल व सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणामुळे काँग्रेसची प्रतिमा मालिन होत असल्याची चिंता, त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दिशा सलियन, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, तसेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरच्या गाडीत सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात मुख्य संशयित असलेले सचिन वाझे आणि आता परमबीर सिंग प्रकरण या सर्व प्रकरणात काँग्रेसची नेमकी भूमिका काय? असा सवाल सातत्याने विचारला जात असून, त्यालाच उत्तर देण्यासाठी, आज बाळासाहेब थोरात यांच्या दिल्लीतील बंगल्यात बैठक बोलावली असल्याचे समजते आहे.

 

या बैठकीला राहुल आणि सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असून, यात प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या घडामोडींवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच यावर काँग्रेस पक्षाने आपली नेमकी काय भूमिका घ्यावी, यावरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.