एकेकाळी तामिळनाडू विधानसभेतही झालं होतं “द्रौपदी वस्त्रहरण”

0

जयललिता यांच्यावर कंगना राणावत अभिनित ‘थलैवी’ नावाचा चित्रपट येत आहे. सध्या या चित्रपटाची छोटीशी झलक लोकांना दाखवण्यात आली असून, त्याला समाज माध्यमांवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आता जयललिता पुन्हा समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्या आहेत.

परंतु, जनतेच्या प्रिया अशा या ‘अम्मा’ना एकेकाळी महिला म्हणून खूप तीव्र विरोध सहन करावा लागला होता. त्यांच्या आयुष्यातल्या “त्या” एका प्रसंगानंतर त्यांनी जी भरारी घेतली की परत त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

जे. जयललिता या दक्षिण भारताच्या राजकारणातील एक ताकदवान नेत्या होत्या. त्यांचा दबदबा अगदी थेट दिल्लीपर्यंत होता. त्या इतक्या कर्तृत्ववान होत्या की, त्यांना एकेकाळी “किंगमेकर” म्हटलं जातं होतं. त्यांनी झगमगती रूपेरी पडद्याची दुनिया सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्या तब्बल ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. पण त्यांना यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

(सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

जयललिता यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील एक फोटो म्हणजे काळ्या साड्यातील हैराण दिसत असलेल्या जयललिता यांचा फोटो. हा फोटो त्या काळात फार गाजला होता. जयललिता यांचा हा फोटो १९८९ मधील आहे.

२५ मार्च १९८९ चा दिवस. जयललिता त्यावेळी विधानसभेच्या एका सत्रात सहभागी झाल्या होत्या. विधानसभेत राज्याचं बजेट सादर केलं जात होतं. जयललिता तेव्हा विरोधीपक्ष नेत्या होत्या. त्या हे पद मिळणाऱ्या तामिळनाडूतील पहिल्या महिला होत्या.

तत्कालीन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री करूणानिधी हे होते. ते बजेट सादर करत होते. त्यावेळी जयललिता यांनी त्यांचा विरोध केला. अशात कुणीतरी करूणानिधी यांच्यावर फाइल फेकली आणि त्यांचा चष्मा तुटला. दोन पक्षांमध्ये हाणामारी सुरू झाली. विधानसभेचं वातावरण क्षणार्धात बदललं. एमके नेत्यांनी जयललिता यांना चारही बाजूनी घेरलं.

दरम्यान, डीएमके नेता दुरई मुरगन यांनी जयललिता यांची साडी खेचली होती आणि कुणीतरी जयललिता यांच्या डोक्यावर मारले होते. कशाबशा जयललिता फाटलेल्या साडीत विधानसभेतून बाहेर पडल्या. तेव्हा त्यांनी जाता जाता शपथ घेतली होती की, त्या विधानसभेत तेव्हाच पाय ठेवतील, जेव्हा त्या मुख्यमंत्री बनतील.

(सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

त्यांचा हा फोटो पाहून त्यांचे चाहते आजही रडू लागतात. हा फोटो इंडियन एक्सप्रेसचा फोटोग्राफर शिवारमनने क्लिक केला होता. नंतर त्यांनी जयललिता यांच्या ऑफिसमध्ये जाऊन या कहाणीचा पाठपुरावाही घेतला होता. तेव्हा जयललिता यांनी त्यांना सारी हकीकत सांगितली होती.

या घटनेनंतर जयललिता यांनी जोरात प्रचार सुरू केला होता. त्यांच्यासोबत झालेल्या घटनेचा त्यांना १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीत फायदा झाला. त्यांना लोकांची सहानुभूती मिळाली होती. तेव्हा त्या रेकॉर्ड २२५ जागा जिंकून विधानसभेत पोहोचल्या होत्या. ‘एआयएडीएमके’ने त्यावेळी निवडणूक कॉंग्रेससोबत मिळून लढली होती. यावेळी जयललिता या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.