“एका जबाबदार मंत्र्याने राज्य सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे” – रोहित पवार

0

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर, ट्विटरवरून टीका करत, गंभीर आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, “महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४% लसीचे लसीकरण झाले आहे. तर ५६% लस पडून कशी राहिली? केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण ५४ लाख लसी देण्यात आल्या होत्या. मात्र, महाराष्ट्राने १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख लसींचाच वापर केला आहे, याचाच अर्थ ५६% लसींचा साठा वापरलाच नाहीये,” त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेवर साशंकता निर्माण झाली होती.

परंतु, या शंका-कुशंकांना दूर करण्याचे काम, आज जावडेकरांच्या टीकेला उत्तर देऊन, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. ‘राज्याला आपल्या मनाप्रमाणे लसीचा वापर करता येत नाही. तज्ज्ञ गटाने ठरवून दिलेला प्राधान्यक्रम आणि नियोजनानुसारच लसीकरण करावे लागते. लसींचा साठा असला, तरी तो परस्पर वितरीत करता येत नाही. त्यामुळे एका जबाबदार मंत्र्याने राज्य सरकारला अशाप्रकारे दोषी धरणे चुकीचे आहे,’ असे उत्तर पवार यांनी जावडेकरांना दिले आहे.

त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, ‘केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या National Expert Group on Vaccine Administration for COVID-19 (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या सूचनेनुसार देशभरात लसीकरण केलं जातं. लसीच्या चाचण्या, लस निवड, योग्य वितरण, खरेदी, वित्तपुरवठा, वितरण यंत्रणा, लोकसंख्या गटांचे प्राधान्यक्रम, लस Safety Surveillance ठेवणे, प्रादेशिक सुसूत्रता आणि शेजारी देशांना मदत आदींची जबाबदारी या गटाकडं आहे.

‘लसींच्या डोसेस वितरणामध्ये काही प्रशासकीय अडचणीही आहेत. कोविनवर लाभार्थ्यांची नोंदणी आणि प्रोग्रेस ट्रॅक करणे ही उद्दिष्टे आहेत. काही लाभार्थी लसीसंदर्भात साशंक असल्याने ती घेण्यास उत्सुक नसतात. त्यामुळं सक्तीने लसीकरण करता येत नाही. कोविन हा डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यानं ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नोंदणी करताना अडचणी येत आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता राज्याला मिळालेल्या लसींपैकी किती डोसेस वापरले हे पूर्णपणे तज्ज्ञ गटाच्या (NEGVAC ) नियोजनावर अवलंबून आहे. त्यामुळं एखाद्या जबाबदार मंत्रीमहोदयांनी लसीकरणाबाबत राज्य शासनाला दोषी धरणं चुकीचं आहे. कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकार काळजीपूर्वक आणि प्रभावी काम करत असतानाही जावडेकर यांच्या आरोपामुळे, लोकांची दिशाभूल होऊ नये, म्हणून काही गोष्टींना समोर आणणे गरजेचे वाटते,’ असं रोहित पवारांनी यावेळी इथे नमूद केलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.