उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला चिंचवडच्या शत्रुघ्न काटेंसाठी, संधी दिली भोसरीच्या हिराबाई घुलेंना!

चिंचवड मतदार संघातील भूमिपूत्र नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी; आगामी महापालिका निवडणुकीत भाजपामध्ये उद्रेक होण्याची शक्यता

0

आमदार लक्ष्मण जगताप यांची पदवाटपात बोटचेपी भूमिका

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ‘कारभारी’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पदवाटपातील बोटचेपी भूमिकेमुळे भूमिपूत्र नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेष म्हणजे, चिंचवड विधानसभा मतदार संघ सोडून जगताप यांनी भोसरी मतदार संघामध्ये पदवाटपाच्या माध्यमातून ढवळाढवळ केली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली. सत्ता मिळवल्यानंतर जगताप यांना पिंपरी-चिंचवडचा ‘बेताज बादशहा’ होण्याची घाई झाली होती. त्यामुळेच आमदार लांडगे यांच्या मतदार संघातील अनेकांना पदवाटपात महत्त्वाची पदे देत लांडगे यांची ‘राजकीय कोंडी’ करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांत जगतापांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी जुन्या गटाचे नगरसेवक केशव घोळवे यांच्या उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळी चिंचवड मतदार संघातील जगताप समर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना उपमहापौरपदी संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, जगताप यांनी ऐनवेळी भोसरी मतदार संघातील आपल्या समर्थक हिराबाई घुले यांना अर्ज भरायला सांगितला. त्यामुळे शत्रुघ्न काटे यांचा पुरता भ्रमनिरास झाला.

विशेष म्हणजे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उपमहापौरपदी आता शत्रुघ्न काटे यांना संधी दिली पाहिजे. अन्यथा नाराजीचा सामना करावा लागेल, असे जगताप यांनी मुंबईतील भेटीदरम्यान सांगितले. त्यासाठी केशव घोळवे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा मुदतपूर्व घेण्यात आला. मात्र, ऐनवेळी हिराबाई घुले यांना अर्ज भरायला सांगण्यात आला. त्यामुळे जगताप यांनी एकप्रकारे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मीसगाईड’ केले आहे, अशी चर्चा आहे.

वास्तविक, आमदार लांडगे संमर्थक वसंत बोराटे उपमहापौरपदासाठी तीव्र इच्छुक होते. मात्र, जगताप यांनी खेळी करीत बोराटे यांचा पत्ता कट केला. याद्वारे संपूर्ण बोराटे कुटुंबीय आमदार लांडगे यांच्यावर नाराज होतील, अशी काळजी घेतली. याउलट नाराज नगरसेवक रवि लांडगे यांच्यासह शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, माया बारणे, चंद्रकांत नखाते, उषा मुंडे यापैकी कोणालाही उपमहापौरपद दिले असते, तर पक्षाच्या हिताचेच ठरले असते, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

जगताप आणि लांडगे यांच्यासह जुन्या गटातील नगरसेवकांना पदवाटपाचे सूत्र भाजपा पक्षश्रेष्ठींमध्ये २०१७ मध्येच ठरले होते. त्यानुसार पदवाटप झालेही काहीप्रमाणात नाराजीचा सामनाही भाजपाला करावा लागला. मात्र, जगताप यांनी आपल्या वाट्याला आलेल्या पदांमधील बहुतेक पदे ही भोसरी मतदार संघातील नगरसेवकांना दिली. स्वत:पेक्षा पर्यायी नेतृत्व चिंचवडमधून निर्माण होवू नये, अशा राजकीय असुरक्षेतून जगताप यांनी कायम भूमिपूत्र नगरसेवकांवर अन्याय केला. ऐकमेव विद्यमान महापौर माई ढोरे यांना संधी देण्यात आली. पण, ढोरे या जगतपांच्या प्रतिस्पर्धी कधीच होवू शकणार नाहीत. डोईजड होणाऱ्या नगरसेवकांचा पत्ता जगताप कट करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काटे, कस्पटे, कामठे, चिंचवडे, भोंडवे, बारणे आदी स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

वर्चस्वाच्या लढाईत सक्षम नगरसेवकांना डावलले…
आमदार जगताप यांनी आमदार लांडगे यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड वर्चस्वाची लढाई सुरू केली आहे. त्यामुळेच जगताप यांनी पदवाटपात सीमा सावळे, विलास मडिगेरी, एकनाथ पवार, हिराबाई घुले आदी समर्थक पण भोसरी मतदार संघातील नगरसेवकांना महत्त्वाची पदे देण्यात प्राधान्य दिले. महापौर माई ढोरे यांचा पिंपरी मतदार संघातील आहेत. स्थायी समिती सभापती म्हणून ममता गायकवाड यांना संधी दिली, पण त्या स्थानिक नाहीत. चिंचवड मतदार संघामध्ये भाजपाकडे महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता असलेले अनेक नगरसेवक आहेत. मात्र, जगताप यांनी भाजपा सत्तेच्या काळात एकाही भूमिपूत्र नगरसेवकांना महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली नाही. याउलट, राजकीयदृष्या प्रभावशाली किंवा उपद्रवी नसलेल्या नगरसेवकांना संधी देण्यात आली. परिणामी, क्षमता असूनही अनेकांना डावलल्याची खंत चिंचवड मतदार संघातील नगरसेवकांमध्ये व्यक्त होत आहे.

माया बारणे यांनी अन्यायाला वाचा फोडली…
नगरसेविका माया बारणे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांना शहर सुधारणा समितीवर घेण्यात आले होते. पण, आमदार जगताप यांनी बारणे यांना महापौरपदी संधी देणार असल्याचा शब्द दिला होता. जगातापांनी आपला शब्द पाळला नाही. लोकसभा निवडणुकी बारणे कुटुंबियांच्या विरोधात जावून जगतापांना साथ दिली. राजकीय कारकिर्दीमध्ये कायम जगताप यांच्या सोबत राहीलो, पण आम्हाला शेवटपर्यंत जगताप यांनी झुलवत ठेवले, अशी भावना माया बारणे यांची आहे. चिंचवडमधील अनेक नगरसेवकांची भूमिका अशीच आहे. त्यामुळे बारणे यांनी अन्यायाला वाचा फोडली असून, आगामी महापालिका निवडणुकीत (२०२२) भाजपामध्ये उद्रेक होणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.