
अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली? – राष्ट्रवादी काँग्रेस
गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली? असा संतप्त प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदी यांना केला आहे.
देशातील परिस्थिती इतकी बिघडली आहे. लोकांना धीर द्यायचे सोडून स्वतः अश्रू ढाळत पंतप्रधान बसले आहेत. मात्र या दुःख व्यक्त केल्याने ऑक्सिजन, बेड, औषधे, लस उपलब्ध करून का दिल्या नाहीत हा प्रश्न मागे पडेल असे नाही. यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
“कोरोनामुळे जीव गमावलेल्यांबद्दल बोलत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले, अशी बातमी सध्या सर्व माध्यमांवर सुरू आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दखल माननीय पंतप्रधानांनी घेतली, ही समाधानाची बाब आहे. मात्र दि. १ मार्च २०२१ रोजी हसतमुखाने लस घेतल्यानंतर मा. पंतप्रधानांनी मागच्या दोन महिन्यात काय उपाययोजना केल्या याबाबतही त्यांनी देशाला माहिती द्यायला हवी. १ मार्च २०२१ रोजी भारतातील कोरोनामुळे झालेले मृत्यू १ लाख ५७ हजार २८६ एवढे होते. हा मृत्यूचा आकडा २० मे २०२१ रोजी २ लाख ९१ हजार ३६६ वर पोहोचला.
मधल्या अडीच महिन्यात जवळपास १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची नोंद झाली. गंगा शववाहिनी झाली. देशभर स्मशानासाठीही रांगा लावून कूपन घेण्याची वेळ आली. मागच्या वर्षभरात जेवढ्या मृत्यूंची नोंद झाली होती, जवळपास तेवढ्याच मृत्यूंची नोंद दुर्दैवाने मागच्या अडीच महिन्यात झाली.
पंतप्रधानांनी नक्कीच अश्रू ढाळावेत. पण या अडीच महिन्यात लोकांना व्हॅक्सिन, ऑक्सिजन आणि औषधे का मिळाली नाहीत? याचेही उत्तर जनतेला द्यावे लागेल. नाहीतर हकनाक ॲक्टर मोदी सारखा हॅशटॅग पुन्हा पुन्हा ट्रेंडिंगला येत राहील”.
अशा आशयाची फेसबुक पोस्ट अधिकृत पेज वरती टाकण्यात आली आहे. या परिस्थिती मधील महत्वपूर्ण अशा मुद्द्यांवर, समस्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे.