अजित पवारांनी अर्थसंकल्पातून दिला शेतकऱ्यांना दिलासा!

0

महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली असून शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा देखील याप्रसंगी करण्यात आली.

दरम्यान, विकेल ते पिकेल’ योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटी रुपयांचा महावितरणला प्रदान करण्यात येणार आहे,’ असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

 

कोरोना काळात उद्योग व सेवा क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात ११ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे, असे ते यावेळी म्हणाले.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला तगवले होते, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्ज थेट वर्ग करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून यंदा तब्बल ४२ हजार कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे, अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी २०० कोटी दरमहा देण्याची तरतूद केली असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवण्याची केंद्राकडे मागणी करण्यात आली असून त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ११३१५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले असून, ५०० किमीचा रस्ता १ मेपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.